कंकेर - छत्तीसगढच्या कंकेर जिल्ह्यात नक्षल्यांकडून जप्त केलेल्या रायफल्स पाकिस्तानी सैन्याच्या असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरूद्ध एन्काउंटर मोहीम राबवण्यात आली होती. यात ४ नक्षलवादी ठार झाले आहेत.
नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी शस्त्रे आढळण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांकडून एक पाकिस्तानी बनावटीची रायफल जप्त करण्यात आली होती. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडून एक जी थ्री रायफल, १२ बोअर रायफल, २ एसएलआर मॅगेझीन्स, दोन रेडिओ आणि काही मोबाईल चार्जर जप्त करण्यात आले आहे. यापैकी काही रायफल्स या पाकिस्तानी सैन्याच्या असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर २ नक्षलवादी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. ४ पैकी २ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचे मृतदेह घेऊन त्यांचे सहकारी पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी शस्त्रे कशी पोहचली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.