डेहराडून - विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून उघडण्यात आले आहेत. यावेळी धामचे पुजारी, रावळ आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आहे. सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 16 जण उपस्थित होते.
केदरानाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिली पुजा पंतप्रधान मोदींच्या नावाने पार पडली. 10 क्विंटल फुलांनी मंदिराला सजवण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावेळी पहिल्यांदाच भाविकांच्या गैरहजेरीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. यंदा पुरोहितांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड ह्या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.