नवी दिल्ली - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळते. आंध्र प्रदेशातील १५० मतदान केंद्रावरील मतदान पुन्हा घेण्यात यावेत, यासंबंधी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे चंद्राबाबू यांनी सांगितले. ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या विलंबामुळे मतदानाची वेळ वाढवण्याची मागणीही चंद्राबाबू यांनी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी गोपाल क्रिष्ण द्विवेदी मतदान करायला गेले तेव्हा ईव्हीएम व्यवस्थित काम करत नव्हते, असेही चंद्राबाबू यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मतदान प्रक्रिया हळूवार चालत असल्यामुळे अनेक महिलांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागले. तसेच ईव्हीएम मशीन बदलल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परतले, असेही चंद्राबाबू यांनी म्हटले आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. देशातील ९१ मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील ७ मतदारसंघांसाठी मतदान पार पडले आहे.