चंदिगड - जगभरातील कोरोना महामारीचा फटका केवळ मोठ्या कंपन्यांनाच बसलेला नाही तर यामध्ये छोट्या व्यावसायिकांसह गरिबांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला छोटेसे दुकान किंवा हातगाडी चालवणाऱ्यांना दोनवेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. चंदीगडच्या सलीमची कथाही अशीच काहीशी आहे.
कमाईचे एकमेव साधन बंद -
विविध आजारांनी ग्रस्त किंवा शारिरीक इजा झाल्यावर मसाजच्या साहाय्याने ठिक करण्याचे काम सलीम खान करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे ते बेरोजगार झाले आहेत. संचारबंदीमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे माझ्या कमाईचे एकमेव साधनही ठप्प झाले आहे, असे सलीम यांनी सांगितले.
पारंपरिक व्यवसाय -
गेल्या अनेक वर्षांपासून चंदिगड येथे रस्त्याच्या कडेला बसून आपण हे काम करतो. माझ्याआधी अनेक पिढ्यांपासून आमच्या खानदानात हेच काम करत आले आहेत. यामुळे मला दुसरे कुठले कामही येत नाही, असे सलीम यांनी सांगितले.
बचत संपण्याच्या मार्गावर -
संचारबंदीपूर्वी मी ७०० ते ८०० रुपये कमवत असे. आता सगळीकडे बंद असल्याने काहीच कमाई झाली नाही. बचत करून ठेवलेले पैसेही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन कसे जगायचे हा कठीण प्रश्न असल्याचे सलीम यांनी बोलताना सांगितले.