देहराडून : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये झालेल्या महाप्रलयाबाबत आतापर्यंत समोर आलेल्या सर्व शक्यता चुकीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हिमनग तुटल्यामुळे हा प्रलय आल्याचे म्हटले जात होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ही शक्यता फेटाळली आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठमध्ये झालेली दुर्घटना ही नदीमध्ये नवीन बर्फ आल्यामुळे झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा..
मुख्यमंत्री रावत यांनी आज इस्रोचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की तपोवन नदीमध्ये आलेला पुरासाठी हिमनग तुटणे नाही, तर नदीमध्ये आलेला नवीन बर्फ जबाबदार आहे.
लाखो मेट्रिक टन बर्फ कोसळला नदीमध्ये..
यासोबतच, मुख्यमंत्र्यांना इस्रोने काही छायाचित्रे दाखवली ज्यामध्ये कुठेही हिमनग तुटलेला आढळून आला नाही. ज्या भागातील हिमनग तुटल्याबाबत बोलले जात आहे, त्याठिकाणी हिमस्खलन होण्यासारखी भौगोलिक परिस्थितीच नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अशातच, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाला. हा कित्येक लाख मेट्रिक टन बर्फ नदीमध्ये पडल्यामुळे, नदीच्या प्रवाहाची गती वाढली, ज्यामुळे कित्येक धरणे तुटली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : चमोली महाप्रलय : संशोधकांनी आधीच दिला होता इशारा