नवी दिल्ली - देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान एका समितीची स्थापना करणार आहेत. बुधवारी या मुद्द्यावर पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याविषयी माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक राष्ट्र एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काल (बुधवार) सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीसाठी देशातील ४० पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी २१ पक्षांनी या बैठकीत भाग घेतला. तर इतर ३ पक्षांनी आपले विचार लेखी पाठवले.
राजनाथ सिंह यांनी सांगितले, की या बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश पक्षांनी एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाचे समर्थन केले आहे. यावेळी भाकप आणि माकप या पक्षांसोबत थोड्याबहुत प्रमाणात मतभेद झाले. मात्र, त्यांनी या विधेयकाला थेट विरोध केलेला नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान एक समिती गठित करणार आहेत. ही समिती निवडणुकींसंबधी सर्व घटकांसोबत चर्चा करणार आहेत. असे सिंह यावेळी म्हणाले. या बैठकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, द्रमुक, तेलगू देसम पार्टी आणि तृणमूल या महत्वाच्या पक्षांनी सहभाग घेतला नव्हता.