नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या ओळखून राज्य आणि केंद्र सरकारने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटले. कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लहान उद्योग बंद पडत आहेत, आधी त्यांच्या समस्या सरकारने सोडवाव्यात, असे त्या म्हणाल्या.
लहान आणि मध्यम उद्योगांतून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळतो. त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने त्यांना अडचणीतून बाहेर काढावे. सरकार नवे उद्योगधंदे सुरू करण्याची गोष्ट करत आहे. नवे उद्योग सुरू करण्यास आमचा विरोध नाही, मात्र, जे उद्योग आधीच सुरू आहेत, त्यांना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्या म्हणाल्या.
'जे स्थलांतरित कामगार त्यांच्या राज्यात माघारी गेले आहेत, त्यांना काही राज्ये पुन्हा माघारी बोलवत आहेत. मात्र, जेव्हा हे सर्व कामगार त्यांच्या राज्यामध्ये होते, तेव्हा त्यांची नीट काळजी घेण्यात आली नाही, त्यांना अन्नधान्य पुरविण्यात आले नाही. त्यामुळेच कामगार माघारी निघून गेले'
राज्यात माघारी आलेल्या कामगारांना सरकारने रोजगार उपलब्ध करुन द्यावा, त्यामुळे कामाच्या शोधात ते माघारी जाणार नाहीत. उत्तरप्रदेश सरकारने माघारी आलेल्या कामगारांची नोंदणी करून घेतली. मात्र, त्यातील अनेक कामगारांना जगण्यासाठी झगडावे लागत आहे, असेही त्या म्हणाल्या.