नवी दिल्ली - नौदलात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने खोटी बिले सादर करणार्या नौदलाचे चार अधिकारी आणि इतर चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी 6.76 कोटी रुपयांची आयटी हार्डवेअर पुरविण्याचे खोटी बिले सादर केली होती.
कॅप्टन अतुल कुलकर्णी, कमांडर मंदार गोडबोले, आर. पी. शर्मा आणि पेटी ऑफिसर (एलओजी) एस अँड ए कुलदीप सिंग बाघेल यांचा घोटाळ्यात समावेश असल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.
सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांचा वापर केल्याचे सीबीआयने प्राथमिक आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींच्या संबंधित ठिकाणी सीबीआयने तपासणी केली आहे.
मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड कार्यालयाला तांत्रिक आणि नेटवर्किंग हार्डवेअर पुरविण्यासाठी जानेवारी ते मार्च 2016 दरम्यान खोटी बिले सादर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही हार्डवेअरचा वेस्टर्न नेव्हल कमांडला पुरवठा करण्यात आला नव्हता. तसेच बिले तयार करण्यासाठी कोणतीही आर्थिक मान्यता व कार्यादेश आदी कार्यालयीन प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली नव्हती.
सीबीआयने संरक्षण दलातील चार लेखापरीक्षकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय स्टार नेटवर्क सायबर स्पेस आणि मोक्ष या कंपन्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.