नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. तसेच 'व्होकल फॉर लोकल', असा नारा दिला. मात्र, यांच्या घोषणा या केवळ पोकळ असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.
गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनवताना चिनी साहित्यांचा वापर करणारे भाजप आता स्वदेशीचा नारा देत आहेत. पंतप्रधान स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास सांगत आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेने भाजप सरकारचा पर्दाफाश केला आहे. भाजप फक्त त्यांच्या आकर्षक घोषणा आणि शुन्य अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध असल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्र सरकारला खरंच स्थानिकांना आत्मनिर्भर बनवायचे असेल, त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या वाढीवर, उत्पादन आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर द्यायला पाहिजे. तसेच लघु अन् मध्यम उद्योगांमधून देशात आत्मनिर्भर बनविण्यावर भर द्यायला पाहिजे, असेही शेरगिल म्हणाले.
भाजप फक्त जनतेला दिवा स्वप्न दाखवत आहे. आता २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा देखील फोल ठरणार आहे. यापूर्वीही त्यांनी १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणे, ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था, तसेच दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे शेरगिल म्हणाले.