रांची - झारखंडची राजधानी रांची येथे काजूची किंमत 600 ते 900 रुपये प्रति किलो आहे. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, इथून 200 किमी अंतरावर असलेल्या जामताडा येथे काजूचा किलोमागे केवळ 20 ते 30 रुपये दर आहे. जामताडाच्या नाला ब्लॉकमध्ये काजूची लागवड केली जाते. येथे साधारण 50 एकरात काजूची लागवड केलेली आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते. स्थानिक लोक कच्च्या काजूची विक्री अगदी उण्या-पुऱ्या भावात करतात.
सरकार 3 वर्षांच्या करारावर काजू बागांचे कंत्राट फक्त 3 लाख रुपयांना देते. थोड्या काळासाठी हे कंत्राट असल्याने कंत्राटदार झाडांची योग्य काळजी घेत नाहीत आणि काजू चोरीमुळेही पिकावर आणि उत्पादनावर परिणाम होतो. असे असूनही दरवर्षी 50 ते 60 क्विंटल काजूचे उत्पादन होते. जिल्ह्यात काजूवर प्रक्रिया होत नसल्यानं कच्चा काजू पश्चिम बंगालला पाठविला जातो. कंत्राटदार कच्चे काजू दीडशे रुपये प्रति किलो दराने विकतात आणि प्रक्रिया केल्यानंतर या काजूच्या किमतीत अनेक पटींनी वाढ होते. सरकारने मनावर घेतले आणि काजू व्यवसायाला अधिक चांगली दिशा दिली तर लोकांचं जीवन बदलू शकेल, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - जागतिक भूक निर्देशांक : 107 देशांमध्ये भारत 94व्या स्थानावर
प्रशासनाने काजू लागवड विकसित करण्यासाठी आणि येथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ईटीव्ही भारतच्या पुढाकारानं जिल्ह्याच्या उपायुक्तांनी काजू लागवडीची पाहणी केली. त्यांनी काजू प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी आणि काजू उत्पादन वाढविण्यासाठी अधिक चांगले प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
जामताडामध्ये काजूच्या लागवडीला भरपूर वाव आहे. राज्यातील लोकांना काजू प्रक्रिया उद्योग सुरू केल्यामुळे केवळ रोजगारच मिळणार नाही तर, काजू उत्पादनासाठी झारखंडचे नावही देशभरात ओळखले जाईल.
हेही वाचा - पेप्सिको उत्तर प्रदेशात सुरू करणार बटाटा चिप्सचे प्लँट