धर्मशाला - कारगिल युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल युद्धामध्ये सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्यांनी कैद करत अत्यंत वाईट वागणूक देत त्यांची हत्या केली होती. सौरभ यांच्या वडिलांना घटनेच्या 20 वर्षानंतर तरी आपल्या मुलाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लघंन करत पाकिस्तानने सौरभ यांना शारिरीक यातना दिल्या होत्या. सौरभ आणि त्यांच्या साथीदारांना न्याय मिळेल, अशी आशा कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सौरभ यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 'मी त्या सर्व सैनिकांचे आभार मानतो जे आपल्या देशाची मान उंचवतात. कठीण परिस्थितीमध्ये काम करून देशाला सुरक्षित ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. भारत देश बदलला असून पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवाईवर सडेतोड उत्तर मिळत आहे. सैनिकांना कारवाई करण्याची सूट मिळाल्यामुळे आंतकवादी घडामोडींमध्ये घट झाली आहे', असे ते म्हणाले.
'सौरभची पाकिस्तानने हत्या केली होती. तेव्हा पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी पाकिस्तानवर कारवाई करण्याचे वचन दिले होते. मात्र, इतके वर्ष उलटूनदेखील याप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही. 2012 मध्ये हे प्रकरण आम्ही उच्च न्यायालयात नेल्यानंतर त्यावर सुनावणी झाली. हे दोन्ही देशांमधील प्रकरण आहे. त्यामुळे यावर विदेश मंत्रालयाने यावर कारवाई करावी', असे ते म्हणाले.
सौरभ कालिया आणि त्यांच्या साथिदारांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. आम्हाला नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे की, ते आम्हाला न्याय देतील असे सौरभ यांच्या आई म्हणाल्या.