लंडन- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आज (शुक्रवारी) कंझरव्हेटीव पक्षाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे नवीन पंतप्रधान पदाच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यानंतर ब्रिटनला युरोपीय संघापासून वेगळे करण्याच्या निर्णयाशी थेरेस मे यांचा कोणताही संबंध असणार नाही.
थेरेसा मे यांनी २४ मे रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मे या गेल्या ३ वर्षांपासून ब्रिटनला युरोपीयन संघापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांच्याच पक्षाचे काही नेते त्यांच्या या निर्णया विरोधात होते. थेरेसा मे यांनी विरोध करणाऱ्या नेत्यांचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही.
थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर हुजुरपक्षाचे नेते आणि परराष्ट्रमंत्री बेरिस जॉन्सन त्यांची जागा घेण्याची शक्यता असे बोलले जात आहे. थेरेसा १३ जुलै २०१६ ला ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या होत्या. त्यानंतर केवळ २ वर्षांतच त्यांनी ब्रेक्झिटचा दावा करत ब्रेक्झिट प्रक्रिया पूर्ण करण्याची शपथ घेतली होती. मात्र, त्या आपली शपथ पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकल्या नाहीत.