नवादा (बिहार) - अलीकडे लग्न ठरल्यानंतर लगेच उरकून टाकण्याकडे सर्वांचा भर आहे. मात्र, सध्या आलेल्या कोरोना संकटामुळे लग्न ठरलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले. पण, बिहारच्या नवादा येते या काळातही विना 'बँड-बाजा-बारात' एक विवाह सोहळा पार पडला.
वधू मेहंदी लागलेल्या हाताला सॅनिटायझर लावून तर वर मास्क घालून लग्नासाठी उभे राहिले. काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नविधी पूर्ण झाला.
नवाजा जिल्ह्याच्या हिसुआ भागातील श्वेता कुमारी आणि शेखपुरा जिल्ह्यातील बरबिघाच्या गौरव कुमारचे लग्न 14 एप्रिलला ठरले होते. मात्र, लॉकडाऊन मुळे लग्न 15 तारखेला करण्याचे ठरले. पण, लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा 18 दिवस वाढल्याने त्यांची गोची झाली. यावर उपाय काढत दोन्ही पक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन कमीत कमी लोकांमध्ये लग्न करण्याचे ठरवले. प्रशासनाकडूनही परवानगी देण्यात आली, मात्र लग्नाच्या ठिकाणी सर्वांना सॅनिटाईझ करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्यास सांगण्यात आले.
सुरक्षित अंतर राखत पार पडला विवाह
कारमधून दोघेजण नवरदेवाला घेऊन शेखपुरामधून नवादा येथे पोहचले. अगोदरच तयार होऊन बसलेल्या नवरीच्या घरी पाच नातेवाईक आणि पुरोहित त्यांच्या साक्षीने लग्नकार्य पार पडले. तेथे सॅनिटायझरचा वापर करत सुरक्षित अंतरही ठेवण्यात आले. या अनोख्या लग्नाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळत आम्ही लग्न केल्याची प्रतिक्रिया नवऱ्या मुलाने लग्नानंतर दिली.