श्रीनगर - अत्यावश्यक परिस्थिती लागणाऱ्या आरोग्य सुविधांसह 'अॅम्ब्युलन्स बोट' काश्मिरातील दल लेकमध्ये सुरू होत आहे. या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना या बोटीचा फायदा होणार आहे. तारिख अहमद पतलो नामक बोट चालकाने ही सुविधा सुरू करण्याचा ध्यास घेतला आहे. तारिख यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा वैद्यकीय मदतीची गरज भासली होती. त्यातून त्यांना ही बोट अॅम्ब्युलन्स सुरू करण्याची कल्पना सुचली.
कोरोना झाल्यानंतर मिळाली कल्पना -
माध्यमांशी बोलाताना तारीख यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळी माझ्या मदतीला माझे मित्र सोडून कोणीही आले नाही. मित्रांनी मला बोटीद्वारे रुग्णालयात पोहचवले. मित्रांशिवाय कोणीही मदत करण्यासाठी पुढे आले नाही, त्यामुळे वाईट वाटले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी रुग्णवाहिका बोट तयार करण्याचा निर्णय घेतला.
अत्यावश्यक सुविधा ठेवण्याचा प्रयत्न करणार -
दल लेक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना अडचणीच्या काळात चांगले उपचारही मिळत नाहीत. त्यामुळे मी तयार करत असलेल्या बोट अॅम्ब्युलन्समुळे लोकांचा जीव वाचविण्यासाठी मदत होईल, असे तारिख सांगतात. ऑक्सिजन सिलेंडर, ईसीजी, ऑक्झिमीटर, व्हिलचेअर आणि स्ट्रेचर सारख्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही तारिखने सांगितले.
३५ फूट लांब बोट -
ही बोट रुग्णवाहिका लाकूड आणि स्टीलपासून बनविण्यात येत असून ३५ फूट लांब आहे. आतमध्ये सुमारे ६ फुटाची जागा रुग्णाला ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. काश्मिरातील दल लेक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी बोटींवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा तीन चार मिनटे उशिरा रुग्ण दवाखान्यात पोहचल्याने दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, असे तारिख सांगतात. त्यामुळे ही बोट नागरिकांचे जीव वाचवणारी ठरेल, असे ते म्हणतात.