नवी दिल्ली : औरंगजेब मार्गावर असलेल्या इस्राईलच्या दूतावासाबाहेर नुकताच एक स्फोट झाला आहे. हा आयईडी ब्लास्ट असून, या स्फोटामध्ये चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, घटनास्थळी तातडीने सुरक्षा दले पोहोचली.
गाड्यांचे नुकसान, जीवीतहानी नाही..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात चार ते पाच गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. इस्राईलच्या दूतावासापासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन दलाचे पथक आणि दिल्ली पोलिसांचे काही वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
जयशंकर यांनी केली इस्राईलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा..
या घटनेला आम्ही गांभीर्याने घेत आहोत, तसेच इस्राईलचा दूतावास आणि तेथील अधिकारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री आम्ही देतो असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्राईलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांना सांगितले. स्फोटानंतर जयशंकर यांनी तातडीने गाबी यांच्याशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिले.
ठिकठिकाणी हाय अलर्ट जारी; दूतावासाची सुरक्षा वाढवली..
या स्फोटानंतर देशभरात ठिकठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि मुंबईमध्ये विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, इस्राईलच्या दूतावासाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
बीटिंग दि रिट्रीट सोहळ्यादरम्यान स्फोट..
अद्याप हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही. विजय चौकामध्ये सायंकाळी बीटिंग दि रिट्रीट सोहळा सुरू होता. या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांना स्फोटाची माहिती मिळाली. यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही जबाबदारी..
अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. हा हल्ला एखाद्या दहशतवादी संघटनेने केला, की यामागे कोणा स्थानिक संघटनेचा हात आहे याबाबतही माहिती समोर आली नाही. बीटिंग रिट्रीट कार्यक्रमादरम्यानच हा स्फोट झाल्यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
यापूर्वी २०१२मध्येही इस्राईलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या स्फोटामध्ये चार जण जखमी झाले होते.
हेही वाचा : राष्ट्रपतींच्या भाषणावेळी पंजाबच्या खासदाराने केल्या 'जय जवान, जय किसान'च्या घोषणा