कोलकाता : पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. राज्यात पक्षाची परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेत्यांचे शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे. या नेत्यांनी गुरुवारी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली.
सुनील देवधर, दुष्यंत गौतम, हरिष द्विवेदी, विनोद सोनकर यांसह विनोद तावडेही या शिष्टमंडळात सहभागी होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची बंगालमधील निवडणुकांच्या कामकाजासाठी निवड केली आहे. या सर्वांकडे उत्तर बंगाल, नैऋत्य बंगाल, नाबाविप, मिंदापोर आणि कोलकाता असे वेगवेगळे विभाग दिले आहेत. या नेत्यांनी गुरुवारी आपापाल्या विभागामधील प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.
स्थानिक नेत्यांशी चर्चा..
या शिष्टमंडळातील नेत्यांनी आपापल्या विभागातील स्थानिक नेते, पक्षाचे जिल्हाधिकारी, माजी जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. हे नेते आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपला अहवाल सादर करतील, ज्यानंतर पक्ष निवडणुकांसाठी पुढील योजना आखेल. पुढील महिन्याच्या सुरुवातीला हे नेते आपला अहवाल सादर करणार आहेत.
टीएमसीचा हल्ला..
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने या शिष्टमंडळावरुन भाजपावर हल्ला केला आहे. बंगालमधील निवडणुकांसाठी भाजप दुसऱ्या राज्यांमधून नेत्यांना बोलवत आहे. अशा प्रकारच्या युक्त्या वापरुन ते बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे दिवास्वप्न पाहतात, हे हास्यास्पद असल्याचे तृणमूल म्हणाले. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आहेत.
हेही वाचा : भाजपाच्या राज्य प्रभारींची यादी जाहीर; तावडेंकडे हरियाणा तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचा भार