नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होईल असे म्हटले. काल (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली. त्यावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी हे वक्तव्य केले.
शरद पवार म्हणाले, की मोदींसह त्यांनी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. मात्र, ते एक उत्तम राजकारणी आहेत. २०१४ म्ध्ये, भाजपला जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज नव्हती, तेव्हा त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. आता भाजपला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, तेव्हा कदाचित पुन्हा एकदा ते भाजपला पाठिंबा देतील असे आठवले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी होऊ घातलेली युती आहे, ती जास्त काळ टिकणार नाही. २०१४ प्रमाणेच पवार कदाचित भाजपला बाहेरून पाठिंबा देतील, असेही आठवले म्हणाले.
शिवसेना-भाजप युतीसाठी तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात का? या प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले, की मी सततपणे तसा प्रयत्न करत होतो. मात्र, त्याचा काही फायदा होताना दिसून येत नव्हता. मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेली शिवसेना ऐकण्याच्या तयारीत नाही दिसत आहे. तरीही, मी त्यासाठी प्रयत्न करत राहील.
हेही वाचा : 'येणारं सरकार तीन पक्षांचं मिळून असेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'