नवी दिल्ली - नोबेल पारितोषक विजेती मलाला युसूफझईने काश्मीरमधील परिस्थितीवर टीका केली आहे. यावर कर्नाटकातील भाजपच्या महिला खासदार शोभा करंदलाजे यांनी टीका करत तुम्ही तुमच्या देशातील अल्पसंख्याक लोकांच्या परिस्थितीवर बोला, असे म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती करणारे ट्विट मलालाने केले आहे. गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले असल्याचे मलालाने म्हटले होते.
हेही वाचा - काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती
यावर करंदलाजे यांनी उपरोधात्मक टीका करताना 'नोबेल विजेत्यास विनम्र विनंती की, त्यांनी पाकिस्तानच्या अल्पसंख्यांकांवर बोलण्यासाठी थोडा वेळ काढावा. तुमच्या देशात अल्पसंख्याक वर्गातील मुलींचा कसा छळ मांडला आहे, त्यावर कठोरपणे बोलणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये कोणतीही दडपशाही केली जात नाही, उलट तेथील विकास आता खुला झाला आहे', असे म्हटले आहे.