इंदौर - महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घटनांबाबत भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेनेवर घणाघाती टीका करून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याच एका भाषणाचा संदर्भ देत सेनेला तृतीयपंथीयांची उपमा दिली आहे.
इंदौर येथे पितृ पर्वतावर भव्य अशा हनुमान मूर्तीचे अनावरण करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यंमाशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, की 'महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. सुरुवातीला शिवसेनेसोबत आमची युती होती. मात्र, त्यांना आता राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. मात्र, अखेर आमचीच विचारसरणी असलेला मुख्यमंत्री बनला आहे', असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या भाषणाबाबत ते म्हणाले, 'हे तेच शरद पवार आहेत, जे काँग्रेसमधून वेगळे होऊन पुन्हा काँग्रेसशी जोडले गेले. शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हटले होते की, सोनिया गांधी यांच्यासमोर तृतीयपंथीच झुकतात आणि आज उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत उभे आहेत.'
ज्योतीराधित्य सिंधिया यांच्या ट्विटरचे स्टेटस बदलण्याबाबत ते म्हणाले, 'काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू आहे. त्यांची कोणतीही विचारधारणा एकसारखी नाही. सत्ता मिळवण्यासाठी युती करतात आणि सत्ता मिळाल्यावर एकमेकांशी भांडण करतात. सिंधिया देखील असेच करत आहेत'.