नवी दिल्ली - देशवासियांनी रविवारी रात्री 9 वाजता घरातील दिवे घालवून 9 मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, दिवे, पणती लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद दिला. मात्र, उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथील भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष मंजू तिवारी यांनी दिवे न लावता आपल्या पतीसह गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष मंजू तिवारी आणि त्यांचे पती ओमप्रकाश तिवारी यांनी परवाना असलेल्या बंदुकीमधून हवेत गोळीबार केला. यावर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी मंजू तिवारी यांची महिला मोर्चा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. दरम्यान मंजू तिवारी यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी एका व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाला 5 एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे पेटवा आणि कोरोनाविरोधात देशाची असलेली एकजूट दाखवा असे आवाहन केलं होतं. या आवाहनाला अवघ्या देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातल्या बहुतांश नागरिकांनी आपल्या घरात राहून दिवा लावला आणि कोरोना विरोधातली एकजूट दाखवून दिली.