रायपूर - छत्तीसगढ काँग्रेस सरकारने 2018 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान दारू बंदी करण्याचे आश्वानसन दिले होते. आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी मंगळवारी निदर्शने केली. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.
दारू बंदी, शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी याप्रकारचे निवडणुकीदरम्यान केलेले एकही आश्वासन काँग्रेस सरकारने पाळले नाही, असा आरोप भाजप नेते उसेंडी यांनी केला. दरम्यान सरकारने दारूची दुकाने उघडली आणि सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढल्याचा आरोप रमणसिंह यांनी केला.
राज्यातील लाखो कामगार देशाच्या विविध भागात अडकले असून अन्न मिळवण्यासाठी धडपडत आहेत. परंतु, राज्य सरकारने त्यांच्या मदतीसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असे रमण सिंह म्हणाले.
त्याचप्रमाणे, आश्वासनानुसार दारूला बंदी घालण्याऐवजी सत्ताधारी काँग्रेसने दारूची घरपोच विक्री सुरू केली आहे. सरकारने दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी रमण सिंह यांनी केली.