इंदौर - भाजप नेते कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. कैलास विजयवर्गीय यांनी घुसखोरांवर अजब वक्तव्य केले आहे. 'मी माझ्या घरी काम करत असलेल्या मजुरांच्या पोहे खाण्याच्या पद्धतीवरून ते बांगलादेशी घुसखोर असल्याचे ओळखले, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी माझ्या घरी बांधकाम सुरू होते. त्यावेळी काही मजूर हे ताट भरून फक्त पोहेच खात होते. त्यांची पोहे खाण्याची पद्धत मला वेगळी वाटली. त्यांच्या मुकादमाशी चर्चा केल्यानंतर ते मजूर पश्चिम बंगालमधून आल्याचे माहित झाले. तेव्हा शंका आली की, ते बांगलादेशी घुसखोर असावे, असे विजयवर्गीय म्हणाले. तसेच गेल्या 1 वर्षापासून एक बांगलादेशी माझ्यावर पाळत ठेऊन असल्याचा दावाही विजयवर्गीय यांनी केला आहे.
मी घराचे बांधकाम करत असलेल्या त्या मजुरांना कामावरून काढले आहे. बांगलादेशी घुसखोर हे देशातील अंतर्गत सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. त्यासाठी देशामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करणे गरजेचे आहे, असे विजयवर्गीय सभेला संबोधीत करताना म्हणाले. दरम्यान त्यांच्या या अजब वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.