पाटणा : बिहार सरकार हे राज्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
जेव्हा राज्यात दिवसाला दहा हजार कोरोना चाचण्यात होत होत्या, तेव्हा सुमारे तीन ते साडेतीन हजार पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत होती. आता राज्यात दररोज सुमारे ७५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत, तरीही रोज नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांवर गेली नाहीये. म्हणजेच, हे सरकार खरी आकडेवारी लपवून जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपली पत राखण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये वाढ करत आहेत असे आरोप यादव यांनी यावेळी केले.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे ६ हजार १०० आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांच्या केवळ १० टक्के चाचण्या या आरटी-पीसीआर पद्धतीने होत आहेत. त्यामुळे, या चाचण्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे यादव म्हणाले.
केंद्र सरकारचा बिहारसोबत दुजाभाव..
यादव यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवरही निशाणा साधला. केंद्राने बाकी राज्यांसाठी ८९० कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारमधील कोरोना परिस्थिती गंभीर असूनही केंद्राकडून बिहारसाठी कोणतीही मदत देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
बिहारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यतं ९० हजार ५५३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यांपैकी ६० हजार ६८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ३० हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, आतापर्यंत कोरोनाच्या ४७५ बळींची नोंद झाली आहे.