भुवनेश्वर - ओडिसामध्ये एका रिक्षावाल्याला वाहतुकीच्या नवीन नियमांनुसार तब्बल ४७,५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हरिबंधु कन्हार असे या रिक्षावाल्याचे नाव आहे. भुवनेश्वरच्या आचार्य विहार परिसरात ही घटना घडली.
हरिबंधु हा दारू पिऊन रिक्षा चालवत होता, तसेच त्याच्याकडे रिक्षाची कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे पोलिसांनी, मद्यपान करुन रिक्षा चालविल्याबद्दल १०,००० रूपये, वाहन चावण्याचा परवाना नसल्यामुळे ५,००० रुपये, आरसी पुस्तक नसल्याबद्दल ५,००० रुपये आणि प्रदूषणासाठी १०,००० रुपये तसेच आणखी काही दंड ठोठावला आहे.
कागदपत्रे जवळ न बाळगल्याबद्दल जो दंड ठोठावला गेला आहे, त्यामध्ये कागदपत्रे सादर केल्यास त्याला सवलत दिली जाईल असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले.
याआधी काल, दिल्लीच्या गुरगावमध्ये एका मोटार चालकाला विना हेल्मेट गाडी चालविल्याबद्दल आणि कागपत्रे जवळ न बाळगल्याबद्दल एकूण २३,००० रुपये दंड ठोठावला गेला होता. विशेष म्हणजे त्या माणसाच्या स्कूटरची किंमतच १५,००० रूपये होती. आपल्याला दंडामधून सवलत मिळावी अशी मागणी तो आता करत आहे.
मोटार वाहन नियमांमध्ये सोमवारी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, विविध अपराधांसाठीच्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. यावर विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर, सोशल मीडियावर याबाबत अनेक उपहासात्मक मीम्स शेअर केले जात आहेत.