नवी दिल्ली - कोरोगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद आयोजन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व तेलूगु कवी डॉ. वरवरा राव तुरुंगात आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ही याचिका लवकर सुनावणीला घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. वरवरा राव यांच्यातर्फे दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने आत्तापर्यंत सुनावणीला घेतली नाही. हे काळजी करण्यासारखे आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
पत्नीतर्फे याचिका दाखल
राव यांच्या जामीनासाठी त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तुरुंगात राव यांना अमानवी आणि क्रूर वागणूक देण्यात येत असून आरोग्याच्या कारणावरून त्यांना जामीन मिळावा, असे याचिकेत म्हटले आहे.
वैद्यकीय कारणावरून मागितला जामीन
राव यांच्या पत्नी हेमलता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. '८१ वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणामुळे काही दिवस जामीन मिळावा. तसेच त्यांना हैदराबादला कुटुंबीयांकडे जाण्याची परवानगी मिळावी. तुरुंगात असताना त्यांचे १८ किलो वजन कमी झाले असून आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा ते सामना करत आहेत', असे याचिकेत म्हटले आहे.
कोरोनाचीही झाली होती लागण
वरवरा राव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. राव यांच्या आरोग्याबाबत तुरुंग प्रशासन कोणतीही माहिती देत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यावेळीही त्यांच्या कुटुंबीयांनी जामीनासाठी अर्ज केला होता. वरवरा राव ज्या प्रकरणात अटकेत आहेत त्याचे स्वरुप पाहिल्यास आरोग्याविषयक अडचणींमुळे जामीन देऊ नये, असे एनआयएने म्हटले होते.
पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलीत नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे पोलीसांनी तपासात म्हटले आहे. परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील काहींची जामीनावर सुटका झाली. मात्र, राव अद्यापही तुरुंगात आहेत.