नवी दिल्ली - बाबरी मशीद प्रकरणातील याचिकाकर्ते मोहम्मद इक्बाल अन्सारी यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरु असलेले मशीद विध्वंस प्रकरण संपविण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय देण्यात आला असून मंदिराचे बांधकामही सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बाबरी मशीद पाडण्याच्या संदर्भात सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू असलेले प्रकरण तातडीने संपवले पाहिजे, असे अन्सारी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय दिला आहे. तो निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. खटला चालू ठेवण्यात काही अर्थ नाही. खटला असाच चालू राहिल्यास समाजातील सौदार्ह बिघडू शकते, असे अन्सारी म्हणाले.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील साक्षीदारांची जवाब नोंदवून घेण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी लवकरच निर्णय येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकालानंतर दोन समुदायांमधील जातीय सलोखा आणखीनच बिघडू शकतो. खबरदारी बाळगत सरकारने हे प्रकरण लवकर संपवायला हवे, असेही ते म्हणाले.
28 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्यामधील रामजन्मभूमी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने 49 आरोपींविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील एकूण ३२ आरोपींमध्ये भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांचाही समावेश आहे. याप्रकरणी चार जूनपासून सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे