नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी पुन्हा एक वक्तव्य करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना त्यांनी लोकसभा अध्यक्ष रमादेवी यांच्यावर वादग्रस्त टीप्पणी केली.
लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाचे रामपूर येथील खासदार आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी मुद्दा मांडताना सुरुवात शायरीपासून केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष रमादेवी यांनी त्यांना माझ्याकडे पाहून बोला, असे म्हटल्यावर त्यांनी शायरीमध्ये वादग्रस्त टीप्पणी केली आहे.
सत्ता पक्षाने गदारोळ करत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. यावर तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात असे खान म्हणाले. जर मी सभेच्या कार्यवाहीमध्ये चुकीचे काही बोललो असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे म्हटल्यानंतर ते सदन सोडून निघून गेले.
यापुर्वी ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ७२ तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली होती. तर नुकतचं मदरशांमध्ये गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती तयार होत नाहीत, अशी वादग्रस्त टिप्पणी ही त्यांनी केली होती.