श्रीनगर - काश्मीर खोऱ्यापासून सुमारे 1100 फूट उंचीवर महादेवाचे मंदीर वसलेले आहे. तत्त्वज्ञ शंकराचार्यांचे नाव असलेल्या या मंदिरातून श्रीनगर शहराचा नयनरम्य देखावा पाहायला मिळतो. शंकराचार्य सुमारे दहा शतकांपूर्वी काश्मीर येथे येऊन गेले होते.
झबरवान पर्वतरांगांमध्ये वसलेले हे महादेवाचे मंदिर जगभरातील पर्यटक आणि हिंदू भक्तांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. महाशिवरात्र, म्हणजेच काश्मिरी पंडितांच्या भाषेत ‘हेरथ’ दिवशी येथे शिवाचे भक्त आणि अनुयायी मोठ्या संख्येने गोळा होतात.
हेरथच्या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरसह जगभरातील भक्तगण शिवमूर्तीची एक झलक पाहण्यासाठी येथे भेट देतात. महादेव म्हणजे भोलेनाथ कोणालाही नाराज करीत नाहीत. मात्र, ही प्रार्थना प्रामाणिक आणि मनापासून केलेली असावी, असा त्यांचा विश्वास आहे. महाशिवरात्रीला महादेवाचे सगळे भक्त जगाला अंधःकार आणि अज्ञानापासून मुक्तता मिळवून देण्याची प्रार्थना करीत संपूर्ण रात्रभर प्रार्थना, उपवास आणि ध्यानधारणा करतात. यंदाही भक्तांनी या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
“मी माझ्या कुटुंबासोबत आले आहे. आम्ही प्रत्येकासाठी पूजा-प्रार्थना केली. विशेष दर्जा रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीर राज्य कठीण परिस्थितीतून जात आहे. या प्रदेशात शांतता आणि एकोपा टिकून राहावा यासाठी आम्ही प्रार्थना केली”, असे जम्मू येथील निवासी रेणुका गुप्ता यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
नेपाळहून आलेल्या आणखी एका भक्ताने सांगितले की, “आम्ही बस, जीप, रेल्वे आणि गाडीने प्रवास करुन इथेवर पोहोचलो होतो. भोलेनाथ काहीही दुरुस्त करु शकतात. आम्ही येथे मोठ्या श्रद्धा आणि अपेक्षेने आलो आहोत. जगातील शांतता पुर्ववत व्हावी या प्रार्थनेसह आमच्या सर्व प्रार्थना पूर्ण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
एकोप्याचे उत्तम उदाहरण
इतिहासकारांच्या मते, उंचावर पायऱ्या चढून गेल्यानंतर अष्टकोनी चौथऱ्यावर असलेले हे मंदिर सर्वप्रथम राजा संदीपान याने बांधले आहे. यानंतर, ख्रिस्तपुर्व 1368 साली राजा गोपादित्याने या मंदीराची दुरुस्ती केली. काश्मिरमधील मुस्लीम राज्यकर्ता झैन उल अब्दिन यानेही भूकंपामुळे कोसळलेल्या मंदिराच्या छताची दुरुस्ती केली आहे. त्यानंतर 1844 साली शीख गव्हर्नर शेख गुलाम मोही-उद्-दिन यांनी मंदिराच्या कळसाचा जीर्णोद्धार केला.
जगातील प्रसिद्ध दाल तलावाच्या पुर्व दिशेस शंकरचार्य मंदिर असून पश्चिमेकडे दुर्राणी काळात बांधलेला हरिपर्बत किल्ला आहे. चेहऱ्याचा दर्शनी भागासमोर कोह-ए-मरन आहे. याठिकाणी मशिद, हिंदू मंदिर आणि गुरुद्वारा आहे. हरिपर्बतालाच कोह-ए-मरन म्हटले जाते. शिव भक्त याला धार्मिक एकोप्याचे उत्तम उदाहरण म्हणतात. जेव्हा सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. या सुर्यकिरणांचा सर्वांना सारखाच प्रकाश मिळतो.
विशेष म्हणजे, या मंदिराला 250 पायऱ्या आहेत आणि येथे पॅरामिलिटरी सैन्याचा पहारा असतो. सुरक्षेच्या कारणामुळे मंदिर आणि आजूबाजूच्या प्रदेशात मोटार, मोबाईल फोन्स, व्हिडिओ आणि कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे.
( लेखक - झुल्कारनैन जुल्फी, श्रीनगर )