नवी दिल्ली - बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराने (एक्यूट एनसिफेलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत तब्बल १६८ मुलांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी आसामचे आरोग्य मंत्रालय बिहार सरकारच्या मदतीला पुढे आले आहे. आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पीजूष हजारिका यांनी ही माहिती दिली.
'बिहार सरकार या आपत्तीशी मुकाबला करण्यास सक्षम आहे. मात्र, त्यांना मदतीची आवश्यकता असल्यास आसाम मदतीचा हात देण्यात उत्सुक आहे. एनसिफॅलायटिसचा धोका आसामलाही आहे. मात्र, आसाम सरकारने या आजाराशी सामना करण्यासाठी आधीच तयारी कली आहे. एनसिफॅलायटिसचा प्रभाव मुख्यत्वे आसामच्या वरच्या भागातील क्षेत्रांमध्ये होतो. राज्यात डॉक्टरांची कमतरता आहे. आमच्याजवळ केवळ ६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यासाठी आम्ही आणखी ७ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार आहोत. त्यामधून प्रत्येक वर्षी कमीत कमी २ हजार ५०० डॉक्टर तयार होतील,' असे हजारिका यांनी सांगितले.
आरोग्यासह शहर विकासाचेही मंत्री असलेल्या हजारिका यांनी केंद्र सरकारने गुवाहाटीला 'स्मार्ट सिटी' घोषित केल्याचे सांगितले. 'राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजनाही लागू करण्यात आल्या आहेत,' असे ते म्हणाले. केंद्राच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाविषयी सांगताना ते म्हणाले की, 'गुवाहाटीमध्ये झालेल्या सुविधांमुळे हे आशियाई देशांमधील प्रमुख केंद्र बनू शकते. गुवाहाटीचा सिंगापूर, बँकॉक आणि ढाक्याशीही थेट हवाई संपर्क आहे.'