सिलचर - आसाम सरकारने शनिवारी २० बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. आसामच्या दक्षिणेकडील करीमगंज जिल्ह्याच्या सुतारकंडी सीमेवरुन या २० जणांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे.
सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २० जणांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले. या २० जणांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता, असे सुरक्षा दलाचे अधिकारी उत्पल शर्मा यांनी सांगितले.
या २० जणांत हिंदू तसेच मुस्लिम नागरिकांताही समावेश आहे. या २० जणांना आसामच्या सिलचर मध्यवर्ती कारागृह व कोक्राझार मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कामाच्या शोधात तसेच आपल्या नातेवाईकांना भेटण्यास हे २० जण भारतात आले होते. त्यांनी याबाबतची कबुली दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.