गुवाहाटी - आसाम सरकारने काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जागेमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता दिली. यानंतर आता काझीरंगा उद्यानात तीन हजार हेक्टर जागेचा समावेश होणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सातव्या, आठव्या आणि नवव्या जागा वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये काझीरंगा उद्यानाला पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आपण पाहिले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आपल्या एकशिंगी गेड्यांसाठी आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
सातव्या प्रस्तावामध्ये नागाव जिल्ह्यातील देओसुर, पालखोवा आणि देओसुर टेकडीचा एकूण १७६ हेक्टर भाग समाविष्ट आहे. आठव्या प्रस्तावामध्ये नागाव जिल्ह्यातीलच ३०७ हेक्टर पसरलेल्या बांदेरदुबी भागाचा समावेश आहे. तर नवव्या प्रस्तावात सोनितपूर जिल्ह्यातील मोकुआ छापोरी या २,५७० हेक्टर भागाचा समावेश आहे.
यापूर्वी हे राष्ट्रीय उद्यान ८८५ वर्ग किलोमीटर परिसरात पसरले होते. यामधील ४८३ वर्ग किलोमीटर भाग हा इस्टर्न आसाम वाईल्डलाईफ डिव्हिजनमध्ये येतो, तर ४०२ वर्ग किलोमीटर भाग हा बिशवनाथ वाईल्डलाईफ डिव्हिजनमध्ये येतो. काल झालेल्या तीन हजार हेक्टरच्या वाढीनंतर आता राष्ट्रीय उद्यानाचा एकूण परिसर हा ९१५ वर्ग किलोमीटरचा झाला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाचे संचालक पी. शिवकुमार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभारही मानले.