गुवाहटी - आसाम राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. पूराच्या पाण्यात अडकून नागरिकांसह शेकडो वन्यप्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, आता काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि पोबीतोरा अभयारण्यातील पूराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
पूराच्या पाण्यापासून प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत. मात्र, आता पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आम्ही बोटींद्वारे वन्यप्राण्यांना खाद्य पुरवत असल्याचे वनविभागाने सांगितले. गेंड्यांना बोटीद्वारे गवत पुरविण्यात येत आहे.
वन्यप्राणी क्षेत्रामध्ये पूराचे पाण्यामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला होता. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान ९५ टक्के पाण्याने भरले होते. १६२ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे पर्यावरण मंत्री प्रमिला शुक्ला यांनी सांगितले. यामध्ये १२ एकशिंगी गेंड्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ पिल्लांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रशासनाने गेंडा बचाव पथक अभयारण्यामध्ये तैनात केलेले आहे. या पथकाद्वारे अभयारण्यासह महामार्ग ३७ वरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पूराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी हा महामार्ग ओलांडून वन्यप्राणी पलीकडे जातात. त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्यात आली आहे.
३१ जुलै पर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शाळा आणि व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. मागील दीड महिन्यापासून आम्हाला औषधे आणि अन्यधान्य मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
सद्यस्थितीत ४३६ मदत केंद्राद्वारे पीडितांना मदत पुरवली जात आहे. बक्सा, नलबारी, बरपेटा, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, धुबरी, कामरुप, मोरीगाव, नागाव, गोलघाट आणि जोरहट जिल्ह्यामध्ये मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.