नवी दिल्ली - आसाममध्ये महापूराने थैमान घातले असून मंगळवारी पूर परिस्थितीत आणखी एकाचा बळी गेला आहे. राज्यातील एकूण मृताची संख्या 130 वर पोहचली आहे. यात पूर-संबंधित घटनांमध्ये 104 जणांचा मृत्यू झाला, तर भूस्खलनात 26 जण ठार झाले. तर जवळपास 20 लाख लोक महापूर बाधित आहेत . ही माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमधील 19.82 लाख लोक पूराने प्रभावीत झाले आहेत. गोलपारा जिल्हा पूराने सर्वांत जास्त प्रभावीत झाला आहे. राज्यात 1,771 गावे आणि 1.04 लाख हेक्टरवरील पीक जमीन पाण्याखाली आहे.
जिल्हा प्रशासन 16 जिल्ह्यात 398 मदत शिबिरे व वितरण केंद्रे सुरू केली आहे. जिथे 42,275 लोकांनी आश्रय घेतला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमधील पुरामुळे 137 जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे एएसडीएमएने सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी बिस्नाथ आणि लखीमपूर जिल्ह्यातील भागांचा दौरा केला. तसेच जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणार्या प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा घेतला.