गुवाहाटी - आसाममधील पुराची स्थिती अजूनही गंभीर आहे. सोमवारी या पुरामुळे मृत झालेल्यांची संख्या ६६ वर पोहोचली. आसाममधील ३३ पैकी १८ जिल्ह्यांमधील ३० लाखांपेक्षा जास्त लोकांना या पुराचा फटका बसला आहे.
या पुरामुळे आतापर्यंत १८७ जनावरे देखील दगावली असून, यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील १६ गेंड्यांचा समावेश आहे. पोबितोरा अभयारण्यातील वन्यजीव मात्र सुदैवाने सुरक्षित आहेत. या वन्यजीवांना सुरक्षित ठेवल्याबद्दल राज्याचे वनमंत्री परिमल शुक्लवैद्य यांनी अभयारण्यातील कर्मचाऱ्यांचे तसेच स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे.
एकूण ९६ हजारांपेक्षा जास्त विस्थापित लोकांना जिल्हा प्रशासनांनी उभारलेल्या ७५७ मदत छावण्यांमध्ये आसरा देण्यात आला आहे. अजूनही २ हजारांहून अधिक गावं आणि एक लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन पाण्याखाली आहे.
दरम्यान, ब्रह्मपुत्रा नदीची पातळी मात्र अजूनही धोक्याच्या वरच आहे. जोरहात, धुबरी, सोनितपूर आणि नागाव जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.