गुवाहटी - आसाममधील तीनसुखिया जिल्ह्यातील बाघजान वायू विहिरीतून मागील काही दिवसांपासून वायू गळती होत होती, त्यातच 9 जूनला वायू विहिरीला आगही लागली आहे. या ठिकाणापासून जवळच असलेल्या तळ्यावर पूल बांधण्यासाठी लष्कराच्या टीमने सर्व्हे केला आहे, अशी माहिती ऑईल इंडिया लिमिटेडने दिली आहे. पूलामुळे वायू विहिरीवर सहजपणे जाता येणार आहे.
वायू विहरीजवळ सोप्या मार्गाने जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लष्कराची मदत घेतली आहे. वायू विहिरीजवळील तळ्यावर 150 मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. लष्कराच्या 3 कॉर्प्सच्या पथकाने परिसराची पाहणी केली. विहीर बंद करण्यासाठी सिंगापूरच्या तज्ज्ञ पथकानेही पाहणी केली आहे.
बाघजान येथील वायू विहीरीतून मागील 20 दिवसांपासून वायू गळती होत आहे. त्यात भर म्हणजे 9 जूनला या विहिरीला आग लागली. त्यामुळे परिसरात धूर पसरला असून पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. अनेकांना आग लागल्यानंतर विस्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांकडून कंपनीच्या हलगर्जीपणा विरोधात आंदोलनही सुरु केले आहे.
दरम्यान, कंपनीने नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. 5 हजार 844 मेट्रिक टन क्रूड ऑईल आणि 70 लाख 53 हजार मेट्रिक स्टॅन्डर्ड क्यूबीक मीटर गैसर्गिक वायूचे 27 जूनपासून नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. अनेक संघटनांनी काम थांबविण्यासाठी दबाव आणल्याचेही कंपनीने सांगितले.
गाड्य़ांची वाहतूक थांबविण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावर अडथळे उभे केले आहेत. 27 मे ला मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडल्यानंतर 9 जूनला वायू विहरीला आग लागली. परिसरातील 1 हजार 610 कुटुंबियांना विस्थापित करण्यात आले असून कोरोना संसर्गापासून काळजी घेत सर्वांना निवारा गृहात हलविण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.