कोटा (राजस्थान) -कोटा येथील सैन्य क्षेत्रामध्ये एका जवानाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (दि. 9 जून) सकाळी उघडकीस आली. रामभाऊ जाधव (वय 24 वर्षे, रा. दिगोई, जि. अहमदनगर, महाराष्ट्र), त्या जवानाचे नाव आहे. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून त्याने केल्याचे त्याच्याजवळील 'सुसाईड नोट'मध्ये लिहिले आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, माला रोड सैन्य स्कूलच्या पाठिमागे लिंबाच्या झाडाला रामभाऊ जाधवचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर पोलीस आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याच्या खिशातून चिठ्ठी सापडली. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. पण, तो तिच्याशी लग्न करू न शकल्याने आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत लिहिले आहे.
जवानाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर सैन्यदलाच्या हवाली करण्यात आला आहे. मृतदेह त्याच्या मूळगावी पाठविण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा - सात काँग्रेस आमदारांच्या विधानसभा प्रवेशाला मणिपूर हायकोर्टाचा मज्जाव