चंदीगड : लष्करप्रमुख मनोर नरवणे यांनी आज (मंगळवार) पंजाब सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. अमृतसर आणि फिरोजपूर येथील वाज्रा कॉर्प्स फॉर्मेशन्सची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी लष्कराच्या तयारीची पाहणी केली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
सोमवारी त्यांनी जम्मू-पठाणकोट भागात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेची पाहणी केली होती. तसेच, या भागातील फील्ड फॉर्मेशन कमांडर आणि सैनिकांचीही त्यांनी भेट घेतली होती. आजच्या भेटीत त्यांच्यासोबत लेफ्टनंट जनरल आर. पी. सिंह, आर्मी कमांडर आणि वेस्टर्न कमांड हेदेखील होते.
वज्रा कॉर्प्सचे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल संजीव शर्मा यांनी नरवणे यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. नरवणे यांनी यावेळी सैनिकांना मार्गदर्शन करत त्यांचे मनोबल उंचावले. तसेच त्यांच्यापैकी धाडसी आणि कर्तृत्वावान सैनिकांना कमांडेशन कार्ड्सही त्यांनी प्रदान केले.
यावेळी बोलताना त्यांनी जवानांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यास सांगितले. तसेच, कोरोनाशी लढण्यासाठी त्यांच्या असलेल्या योगदानाबाबत त्यांचे कौतुकही केले. यासोबतच त्यांनी सदैव सज्ज राहण्याच्या सूचनाही सैनिकांना दिल्या.