नवी दिल्ली - भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हे पदक देण्यात आले.
त्यांच्याशिवाय, काही लष्करी अधिकाऱ्यांचा आणि सीआरपीएफ जवानांचाही सन्मान करण्यात आला. शिपाई व्राह्मा पाल सिंग आणि सीआरपीएफ जवान राजेंद्र नैन, रविंद्र धनवडे यांना मरणोत्तर कीर्ती चक्र देण्यात आले. हा शांततेच्या काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. त्यांच्या वीरपत्नींनी आणि वीरमातांनी हा पुरस्कार स्वीकारला.
२० जाट रेजिमेंटचे मेजर तुषार गौबा यांना कीर्ती चक्र देण्यात आले. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ ३ दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल त्यांना हे पदक देण्यात आले. १२ लष्करी अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांना शौर्य चक्र प्रदान केले. हा शांततेच्या काळातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
समारंभावेळी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.