नवी दिल्ली - कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या दिल्ली पोलिसांमध्येही कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या रोहिणी येथील एक पोलीस हेड कॉन्स्टेबल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचीही दुसरी घटना असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोरोनाची लागण झालेले ४४ वर्षीय हेड कॉन्सटेबल हे त्यांच्या कुटुंबासोबत रोहिणी येथे राहतात. सध्या ते दिल्लीच्या इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी - ३ मध्ये एफआरआरओ ब्रँचमध्ये आहेत. त्यांच्या कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर आंबेडकर रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विशेष रुग्णवाहिका आणि पॅरामेडिकल स्टाफद्वारे एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आता त्यांच्या कुटुंबातील ३९ वर्षीय पत्नी, १८ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीला डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले आहे.
याआधी गेल्या मंगळवारी दक्षिण दिल्लीमध्ये राहणाऱ्या पोलीस ठाणेदारालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असतानाही सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊनही दिल्ली पोलिसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.
एकीकडे दिल्लीमध्ये लॉ अॅण्ड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्थेसह लॉक डाऊनचेही नियम सक्तीने पाळण्यात येत आहे. असे असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीमध्ये २० पेक्षा जास्त ठिकाणे ही हॉटस्पॉट बनवून पूर्णत: सील करण्यात आली आहे. मात्र, आता दिल्ली पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली असून संख्या वाढत असल्याने पोलिसांसह प्रशासनापुढेही यावर तोडगा काढण्यासाठीचा एक गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.