अमरावती - आंध्र प्रदेश सरकारने आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तब्बल 1 हजार 88 नव्याकोऱ्या रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. विजयवाडा शहरात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवत या सेवेचा आरंभ केला. राज्यातील कानाकोपऱ्यात अत्यावश्यक वैद्यकीय मदत देण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.
सरकार 'फॅमिली डॉक्टर' संकल्पना राबवणार असून रुग्णांचे डिजीटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी उद्घाटनावेळी सांगितले. रुग्णवाहिका चालकांना पगारवाढ करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या योजनेसाठी सरकारने 201 कोटी रुपये खर्च केले आहेत.
सर्व रुग्णवाहिका अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहेत. ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, इन्फूजन पंप, सिरिंज पंप, स्ट्रेचर आणि अत्यावश्यक स्थितीत प्रसूती करण्यासाठीची सुविधाही देण्यात आली आहे. लहान बालकांना रुग्णालयात घेवून येण्यासाठी काही विशेष रुग्णवाहिका ठेवल्या आहेत.
आणीबाणीच्या काळात तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी हा उद्देश या योजनेमागे आहे. रुग्णवाहिका किती वेळात घटनास्थळी पोहचले यासाठी वेळही ठरविण्यात आला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत शहरी भागातून फोन आल्यावर 15 मिनिटात रुग्णवाहिका पोहचेल, तर ग्रामीण भागात 20 मिनिटे लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.