नवी दिल्ली - देशात अन्य शहरांच्या तुलनेत दिल्लीत कोरोनाचा कहर पाहता दिल्लीची सुत्रे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शाह आपल्या हातात घेणार आहेत. जून महिन्यात दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्ली सरकार हतबल झाले होते. त्यावेळीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण सूत्रे आपल्याकडे घेतली होती.
नॉर्थ ब्लॉक गृह मंत्रालयात अमित शाहंशी भेटणार केजरीवाल -
हिवाळ्याच्या सुरूवातीलाच दिल्लीत कोरोना संक्रमणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज बैठकीसाठी बोलावले आहे. त्यांच्यामध्ये कोरोना नियंत्रणावरून चर्चा होईल. आज सायंकाळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैनही उपस्थित असतील.
रुग्णालयात बेड राखीव ठेवण्याची मागणी -
केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये बेड संख्या वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गृहमंत्री शाह यांच्याकडे करण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी घोषणा केली होती, की दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सरकारडून ठोस उपाय केले जातील. या उपाययोजनांबाबतही या बैठकीत चर्चा होईल.
केंद्राकडून मदतीची अपेक्षा -
दिल्लीचे मुख्यमंत्री रुग्णालयात बेड संख्या वाढविण्याबरोबरच अन्य मागण्याही केंद्र सरकारकडे करू शकतात. ज्यामध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी अन्य राज्यांचा सहयोग सामील आहे. सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीत प्रतिदिन 55 ते 60 हजार चाचण्या होत आहेत. त्यात सात ते आठ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.