नवी दिल्ली - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), ऋषिकेश अँड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), बंगळुरू यांनी रिमोट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम (दुरून आरोग्यावर देखरेख करता येईल अशी प्रणाली) विकसित केली आहे. या यंत्रणेद्वारे घरातील आणि रुग्णालयांतील कोविड 19 चा रुग्णांवर दूरूनच देखरेख करता येणार आहे.
या यंत्रणेद्वारे रुग्णाच्या शरीराचे तापमान, नाडी, रक्तातील ऑक्सिजन, श्वसनाचा वेग या सर्वांवर डॉक्टर दूरूनच देखरेख ठेवू शकणार आहेत. तसेच, या रुग्णांसाठी आवश्यक खबरदारी आणि उपचार दोन्ही सुचवू शकणार आहेत.
सध्या भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील आरोग्य आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. या नव्या प्रणालीमुळे एम्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. तसेच रुग्णाला ॲपद्वारे डॉक्टर वेळेवर उपचार देऊ शकणार आहेत. रुग्णालयासाठी घरच्या घरी रुग्णालयात न जाता उपचार मिळणार आहेत. घरातील व्यक्ती ही या प्रणालीचा वापर करून रुग्णाशी थेट संपर्क टाळू शकणार आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तेही आजारातून लवकर बरे होतील. याशिवाय डॉक्टर परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा रुग्णाशी थेट संपर्क येणे कमी झाल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे.
एम्स ऋषिकेशच्या रेडिओलॉजी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मोहित यांनी ही प्रणाली तांत्रिकदृष्ट्या पुढारलेली आहे. याचा रुग्णालय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच, यामुळे संसर्ग पसरण्याचा धोकाही कमी होत आहे. शिवाय, डॉक्टरांना इतर मोठ्या आजारांमधील रुग्णांवरही लक्ष देणे सोयीचे होईल. या प्रणालीला अद्याप वैद्यकीय प्रमाणीकरण मिळणे बाकी आहे.