नवी दिल्ली : पुढील वर्षी कोरोनाची लस बाजारात येण्याची आशा देशातील सर्वच नागरिकांना आहे. यासाठी अगोदर सर्व लसींच्या चाचण्या पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात, म्हणजेच दिल्लीच्या एम्समध्ये कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी स्वयंसेवकच मिळेनासे झाले आहेत.
स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन..
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर संयुक्तपणे बनवत आहे. भारतात तयार होत असलेली ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची लस आहे. या लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून आता देशभरात १२ ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. तीनही टप्प्यांमधील चाचण्या पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर केल्याशिवाय या लसीच्या वापराला परवानगी मिळणे शक्य नाही. त्यामुळे नवीन वर्षीत लस हवी असेल, तर लवकरात लवकर सर्व चाचण्या पार पाडणे आवश्यक आहे.
लस बाजारात येणारच आहे तर चाचणी का?
एम्सने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना आता लस येण्याबाबत एवढी खात्री झाली आहे की जर आता लस येणारच आहे तर चाचणीमध्ये का सहभागी व्हा? असा विचार बहुतांश लोक करत आहेत. त्यामुळेच रुग्णालयाला स्वयंसेवक मिळवण्यात अडचण होत आहे.
१,५००ची गरज, केवळ २०० नोंदण्या..
या चाचणीसाठी एम्सला सुमारे १,५०० स्वयंसेवकांची गरज आहे. मात्र, आतापर्यंत केवळ २०० स्वयंसेवकांनीच यासाठी नोंदणी केल्याचे समोर आले आहे. एम्समधील कोरोना लस मानवी चाचणीचे समन्वयक डॉक्टर संजय राय यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : बेळगावमध्ये 'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात; आतापर्यंतच्या चाचण्या यशस्वी