नवी दिल्ली - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न पुन्हा प्रयत्न केला आहे. आज (गुरुवार) त्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहून आठ मुद्द्यांवर लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले. मात्र, शेतकरी मागण्यांवर ठाम आहेत. आधी तिन्ही कायदे रद्द करा, त्यानंतर चर्चा करू, अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. मात्र, सरकार कायदे रद्द न करता, चर्चा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. आत्तापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या असून यातून तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच आहे.
कृषी मंत्र्यांचे लेखी आश्वासन -
किमान आधारभूत किंमतीसह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे. आज दिल्ली विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला कृषी कायद्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर टीका करत कायद्यांच्या प्रती फाडल्या. आम आदमी पक्षाच्या आमदारांनीही वादग्रस्त कायद्यांच्या प्रती फाडल्या.
मोदी शेतकऱ्यांशी साधणार संवाद -
पंतप्रधान मोदी उद्या (शुक्रवार) मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे मोदी शेतकरी संमेलनात सहभागी होणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील २२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे सरकारने आधी रद्द करावे, त्यानंतरच चर्चा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकऱ्यांशी काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या -
दिल्लीच्या सिंघू सीमेवर हजारो शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणासह विविध राज्यातील शेतकरी सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. बरोबर येताना शेतकऱ्यांनी सुमारे सहा महिन्यांचे राशन बरोबर आणले आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.