कोलकाता - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तेलगू कवी वरवरा राव अटकेत आहेत. मात्र, 81 वर्षीय वरवरा राव यांच्याकडून देशाला कोणताही धोका नाही, असे पत्र लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना लिहले आहे. महाराष्ट्रात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेशी माओवाद्यांचे कनेक्शन असल्याप्रकरणी राव यांच्यासह इतर 10 नेत्यांना अटक करण्यात आली होती.
81 वर्षीय वरवरा राव यांचा गुन्हा काय आहे? हे माहिती नसतानाही ते तुरुंगात आहेत. आता ते मानसिकदृष्या खचलेले असून त्यांना वैद्यकीय सहाय्य मिळत नाही. तुम्ही या प्रकरणात कृपया लक्ष घाला आणि त्यांचा जीव वाचवा. अन्यथा आपल्या पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असे पत्र चौधरी यांनी मोदींना लिहले आहे.
एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्यावरून राव आणि इतर 9 सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या खटल्याचा सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला. मात्र, नंतर याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता. 31 डिसेंबर 2017 साली पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भडकाऊ भाषणे दिल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. या परिषदेनंतर पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता.