हैदराबाद - हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. या प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'जस्टिस फॉर दिशा' करण्यात आले होते. आज या प्रकरणातील चारही नराधमांचे एन्कांउटर करण्यात आले आहे.
आरोपींचे एन्कांउटर...
हैदराबाद पोलीसांनी पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. आज या प्रकरणातील चारही आरोपींचे पहाटे एन्कांउटर करण्यात आले आहे.
आरोपींची नावे - मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती.
बलात्काराचा कट -
हैदराबाद येथे 27 नोव्हेंबरला महिला डॉक्टर दिशा रात्री रुग्णालयातून घरी जात होत्य़ा. यावेळी आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर केले. गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. यावेळी वेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला आणि स्कुटी दुरुस्त करुन देतो असे सांगत काही अंतरावर स्कुटी घेऊन गेला. त्यानंतरआरोपींनी दिशाला निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
तोंड दाबल्याने झाला मृत्यू...
बलात्कारावेळी दिशा यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये, यासाठी दिशाचे तोंड दाबून ठेवले. त्यामुळे श्वास घेऊ न शकल्याने दिशाचा गुदमरुन मृत्यू झाला.
बहिणीशी झाले होते शेवटेचे बोलणे...
दिशाचे शेवटचे बोलणे हे त्यांच्या बहिणीशी झाले होते. त्यावेळी काही लोक आपल्याला मदत करत आहेत. मात्र त्यांची भिती वाटत असल्याचे त्यांनी बहिणीला सांगितले. त्यानंतर दिशाच्या बहिणीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दिशाचा फोन बंद असल्याचे समजले. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत प्रकरण उघडकीस आणत आरोपींना अटक केली होती.
विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली...
पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी लवकरात लवकर निकाल यावा यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. महबूबनगर जिल्हा न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याप्रकरणासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असल्याची माहिती दिली होती.
निष्काळजीपणा दाखविल्याने तीन पोलीस निलंबित...
चौकशी प्रकरणी निष्काळजीपणा केल्याने सहायक पोलीस निरीक्षक एम. रवी कुमार आणि पोलीस हवालदार पी. वेणू गोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनर यांनी सांगितले.
आरोपींच्या आईची प्रतिक्रिया...
'ज्याप्रकारे त्यांनी दिशाला जाळले. त्याचप्रकारे माझ्या मुलालाही जिवंत जाळा' अशी संतप्त प्रतिक्रिया केशवुलू या आरोपीच्या आईने दिली होती. तर इतर दोन आरोपींच्या पालकांनी जर आमची मुले दोषी अढळली, तर त्यांना शिक्षा करा असे वक्तव्य केले होते.
देशभरात पडसाद...
हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून केली जात होती. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली.