नवी दिल्ली- शहरातील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने कोंडली मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार मनोज कुमार यांना सात दिवसाची कोठडी सुनावली आहे. मनोज कुमार यांच्यावर २०१४ साली एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता होता. या प्रकरणी न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे.
एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट समर विशाल यांच्या उपस्थितीत या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने कुमार यांच्यावर ५०० रुपयाचा दंड सुद्धा लावला आहे. हा दंड न भरल्यास त्यांच्या शिक्षेत अजून तीन दिवसाची भर घालण्यात येणार आहे.
यावेळी न्यायालयाने कुमार यांना या निर्णयाविरूद्ध अपिल करण्यासाठी दहा दिवसांची मुद्दत दिली आहे. त्यासाठी न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर तीस दिवसाचा जामीन दिला आहे.
जाणून घ्या नेमके काय होते प्रकरण
८ फेब्रुवारी २०१४ साली शहरातील काही महिला पाणी साचल्याच्या कारणावरूण आमदार मनोज कुमार यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यावेळी आमदार कुमार आपल्या दालनात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिला माघारी परतल्या. मात्र वाटेत त्यांना आमदार कुमार यांची कार दिसून आली. ते कार मधून उतरत होते. यावेळी महिलांनी कुमार यांच्या समोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. मात्र कुमार यांनी 'मला त्रास देऊ नका' असे म्हणत तक्रारकर्त्या महिलांना मागे ढकलले.
येथेच न थांबता जेव्हा महिला तक्रारकर्त्या माघारी परतत होत्या तेव्हा आमदार कुमार यांच्या एका समर्थकाने तक्रारकर्त्या महिलांमधील एका महिलेच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मारा केला. यावेळी महिलेचा बचाव करण्यासाठी सरसावलेल्या राजन या व्यक्तीला सुद्धा आमदाराच्या समर्थकाने जोरदार मारहाण केली होती.
त्यानंतर तक्रारकर्त्या महिलांनी या घटनेबाबत न्यू अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर न्यायालयात खटला सुरू असताना, तक्रारकर्त्या महिलांची संख्या जवळपास १००-१५० च्या दरम्यान होती. तसेच या महिलांच्या जमावाने माझ्या दालनामध्ये तोडफोड केली, असे आमदार कुमार यांनी आपल्या बचावात सांगितले.