नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी केला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील सभेत ज्यांनी भाग सहभाग घेतला होता त्यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण अभियान चालवले जात आहे, असा आरोपही विजयन यांनी केला आहे.
सध्या देशामध्ये कोरोना महामारीचे संकट आहे. जर कोणी धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यात सहभाग घेतलेल्या बांधवांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता सध्या या कार्यक्रामातील सहभागी लोकांचा शोध घेतला जात आहे.