रायपूर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील नीमकाथाना गावामधील एक आजीबाई सध्या चांगल्याच प्रसिद्ध होत आहेत, आणि त्याला कारणही तसेच आहे. विद्या देवी या ९७ वर्षांच्या आजींनी, गावात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. या आजी गावातील वृद्ध महिलांसोबत बसून गावच्या विकासाचे मॉडेल, स्वच्छता, स्वच्छ पाणी, विधवा पेन्शन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात.
राजकीय अनुभव..
या आजींचा राजकीय अनुभव हा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम हे २० वर्ष सरपंच होते. तसेच ५५ वर्षांपूर्वी त्यांचे पती हुतात्मा मेजर शिवराम सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवाय, त्यांचा नातूदेखील वॉर्ड २५ मधून नगरसेवक आहे. लग्न झाल्यापासूनच त्यांनी राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच यावर्षी या वयातही प्रचंड आत्मविश्वासाने त्या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
मतदानाच्या विविध पद्धतींच्या साक्षीदार..
आतापर्यंत पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या विद्या देवींनी सांगितले, की स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या सरपंच किंवा गावप्रमुख निवडण्याची प्रक्रिया पाहत आल्या आहेत. हात वर करून मतदान करत गावप्रमुख निवडणे, कागदावर शिक्का मारून मतदान करणे, तसेच आता आलेल्या अत्याधुनिक अशा ईव्हीएम मशीनवरदेखील त्यांनी मतदान केले आहे. या बदलत्या काळात आपल्या गावानेही बदलले पाहिजे, हा विचार घेऊन त्या या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत.
हेही वाचा : महात्मा गांधींना भारतरत्न देण्याबाबत केंद्राला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार