नवी दिल्ली - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांनी आज (रविवार) 8 हजारांचा टप्पा ओलांडला. मागील 24 तासांत 909 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार 447 झाला आहे, तर 34 रुग्ण दगावले आहेत. आत्तापर्यंत देशात 274 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 716 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
एकूण 1 लाख 95 हजार 748 जणांचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 81 हजार 28 नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने सांगितेल आहे. मागील पाच दिवसांपासून सरासरी 15 हजार 747 वैद्यकीय नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील सरासरी 584 जणांची चाचणी 'पॉझिटिव्ह' आली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. मनोज मुऱ्हेकर यांनी दिली आहे.
या जीवघेण्या विषाणूवर लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक रात्रंदिवस काम करत आहेत. भारतात कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. '40 विविध लसी बवनिण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही लस विकासाच्या पुढच्या टप्प्यावर पोहचली नाही. अजून कोरोनावर कोणतीही लस नाही, असेही ते म्हणाले.